पावसाळ्याच्या आधी
पक्ष्यांची लगबग सुरु होते. पावसाळा हा पक्ष्यांचा पिलांना जन्म देण्याचा काळ
असतो. कारण पावसाळ्यात अन्न, पाणी आणि
आश्रयासाठी चांगली घनदाट झाडी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. म्हणून हा काळ
पिल्लांचे संगोपन करायला सोयीचा असतो. पक्षी घरट्यासाठी एकदम सुरक्षित जागा
निवडतात जिथे कोणताही भक्षक सहजासहजी पोहोचू शकत नाही. मी एकदा गोरेगावला
चित्रनगरी मध्ये एका स्वर्गीय नर्तकाचे (Asian Paradised Flyacatcher) कपाच्या
आकाराचे छोटेसे घरटे पहिले होते. त्याने ते घरट अत्यंत दाट झाडीत(Canopy) केल होत
जिथे भरपूर डास होते. ह्या जागी भरपूर खाद्य असल्यामुळे आणि पिल्लांसाठी सुरक्षित
जागा असल्यामुळे नर्तकाने घरट इकडे करायचं निश्चित केल होत. बारीक सारीक गोष्टी
न्याहाळूनच पक्षी घरट करण्यासाठी जागा निवडतात.
पक्षी घरटी बनवण्यासाठी झाडाच्या काड्या,
वेगवेगळ्या wires, सापाची कात, झावळीचे हिरे आणि कोळ्याच्या जाळ्याचे तंतू यांचा
वापर करतात. दोन दिवसांपूर्वीच माझ्या घराच्या खिडकीमध्ये एक नाचरा पक्षी
कोळ्याच्या जाळ्याचे तंतू घेऊन जाताना दिसला. मी लगेच बाहेर जाऊन तो कुठे जातो आहे
ते पाहिलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो नाचरा पक्षी त्याच्या घरट्याकडे जाताना
दिसला. तसेच एकदा नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये फिरत असताना मला एका सामान्य
खाटिक (Common
Woodshrike) या पक्ष्याने बिबट्याच्या विष्ठेतले केसाचा पुंजका उचलताना पाहिलं
होत. त्याचा पाठलाग केल्यावर मला तो पक्षी आपल्या घरट्यात जाऊन ठेवताना दिसला.
त्याने आपल्या पिलांसाठी मऊ गादी म्हणून केसांच्या पुंक्याचा उपयोग केला होता.
पक्ष्यांची
घरटी सुद्धा वेगवेगळ्या आकाराची असतात. कावळ्याचे घरटे हे फार ओबडधोबड असते.
बुलबुल, नाचरा, कोतवाल यांची घरटी कपाच्या
आकाराची असतात. काही पक्षी जमिनीवरच अंडी घालतात. ह्यात टिटवी (Lapwing), रातवा
(Nightjar) यांचा समावेश होतो. ह्या पक्ष्यांची अंडी उघड्यावर असतात तरीही त्यांना
आपण सहजासहजी पाहू शकत नाहीत. अंड्यांचा मातकट रंग मातीशी मिळताजुळता असल्यामुळे
त्यात ते मिसळून (camoflage) जातात. कडाक्याच्या उन्हाळ्यात अंडी करपून जाऊ नयेत
म्हणून मादी टिटवी आपलं पोट भिजवते आणि परत अंड्यांवर अंडी उबवायला येऊन बसते.
जेणेकरून अंडी करपणार नाहीत. काही पक्षी झाडावरच्या नैसर्गिक ढोलीचा घरटे म्हणून
वापर करतात. यात घुबड, धनेश, तांबट पक्ष्यांचा समावेश होतो. मी माझ्या
सोसायटीमधल्या एका जांभळाच्या झाडाच्या सुकलेल्या फांदीवर असलेल्या छोट्याश्या
ढोलीमध्ये तांबट पक्ष्याने घरट केलेलं पाहिलं होत. तर काही पक्षी चोचीने झाडाच्या
खोडावर ढोली तयार करतात. यात सुतार पक्षी तरबेज असतो. त्याची चोच सुद्धा एकदम दणकट
असते. खोडावर चोच आपटल्यावर drum वाजवल्यासारखा आवाज येतो म्हणूनच याच्या आवाजाला
drum sound म्हणतात. जंगलात किंवा गावात असे आवाज हमखास ऐकायला मिळतात. तसेच शिंपी
पक्षी दोन पान शिवतो आणि त्यात कापसाची गाडी बनवतो. त्यावर अंडी घालतो. मी एकदा
माझ्या कॉलेज मध्ये शिंपी पक्ष्याच्या घरट्यात दोन अंडी घातलेली पहिली होती. पण
लोकांची रेलचेल(human interference) जास्ती असल्यामुळे त्यांनी ते घरटे अर्धवट
सोडून दिले.
तसेच सुगरणीचे घरटे
बघण्यासारखे असते. घरट्यात जायला खालच्या बाजुने प्रवेश केलेला असतो. हे भक्षकाला
पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांची पिल्ल सुरक्षित राहतात. सुगरणींच्या घरट्याला
बाजूला एक खळगा केलेला असतो. त्या खळग्यात पक्षी अंडी घालतात. हा खड्डा पश्चिमी
वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला बांधला जातो. जेणेकरून वार्यामुळे आतमधली अंडी बाहेर
पडणार नाहीत. सुगरणीच घरट पाहिलं की बहिणाबाई चौधरींच्या खोपा या कवितेमधली दोन
कडवी आठवतात.
खोपा
इनला इनला
जसा
गिलक्याचा कोसा
पाखराची कारागीर
जरा देख रे माणसा!
तिची
इवलीशी चोच
तेच
दात, तेच ओठ
तुला देले रे देवानं
दोन हात दहा बोट!
पक्ष्यांसारखी
भक्कम, मजबूत आणि अतिशय सुभग अशी घर माणूस बांधू शकत नाही. निसर्गामध्ये प्रत्येक
जीवाला एक अजब देणगी दिलेली आहे.