श्री गुरवे नमः
कासचं पुष्पपठार
मी बाबांना विचारलं, ”या सुट्टीत सहलीला कुठं जायचं ? एखाद्या आगळ्यावेगळ्या ठिकाणी जाऊया. नेहमी इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडला जाऊन अगदी कंटाळा आलाय.” आई म्हणाली, “जवळच कुठेतरी जाऊ. सुट्टी दोनच दिवसांची आहे.” “बघू.” बाबा म्हणाले आणि वर्तमानपत्र वाचण्यात गुंग झाले. आई स्वयंपाकघरात जायला निघाली तेवढ्यातच बाबा म्हणाले, “कासच्या पुष्पपठारावर जाऊया का ? आपल्या अगदी जवळ आहे.” असे म्हणत बाबांनी तो सगळा लेख आम्हाला वाचून दाखवला आणि म्हणाले, “हे पठार साताऱ्याला आपल्या राजूकाकाच्या फार्महाउसच्या अगदी जवळच आहे.” “बस्, तर मग, आता जायचंच” मी म्हणाले.
जायचा दिवस उजाडला. आम्ही पहाटेच गाडीने निघालो, कारण प्रवास लांबचा होता. पाच साडेपाच तासांच्या लांबलचक प्रवासानंतर थेट फार्महाऊसवर पोहोचेपर्यंत आम्ही कंटाळलो होतो. ताजेतवाने होऊन, जेवून, विश्रांती न घेता लगेच पठारावर जायला निघालो. माझ्या मनात खूप कुतूहल होतं, हे पुष्पपठार आहे तरी कसं ? वर्तमानपत्रात दिलेल्या फोटोसारखं सुंदर असेल का ? मी विचारात मग्न असताना आई म्हणाली, “चल, उतर आता गाडीतून.”
गाडीतून उतरताच मी जे पाहिलं ते कधीच विसरू शकणार नाही. समोरचं मोठं विस्तीर्ण पठार निरनिराळ्या रंगाच्या छोटुकल्या फुलांनी बहरलं होतं. हे दृष्य फोटोपेक्षा कितीतरी सुंदर होतं. गुलाबी रंगाचा मोठ्ठा गालीचा, त्याच्या मध्ये एक ओबडधोबड दगड आणि त्यावर छोट्या पिवळ्या गुच्छ..... मी आईला लगेच म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात जणु स्वर्ग अवतरलाय. मी त्या फुलांना बघायला जवळ गेले तर कुणीतरी मला हाक मारत होतं. आजूबाजूला तर कुणीच नव्हतं. मग मी एका फुलाकडे पाहताच त्याने चक्क हसत मला विचारलं, “तुझं नाव काय गं ?” मी काही न बोलता नुसती बघतच राहिले. मग माझं नाव सांगितल्यावर ते म्हणालं, “माझं नाव आहे सोनू.” “अशी नावं तर माणसांची असतात. त्या बाईंनी तर तुझं नाव मिकी माउस असं सांगितलं.” मी म्हणाले. “अगं, ते नाव तर आमचा अभ्यास करायला इकडे येणाऱ्या माणसांनी आमच्या जातीला दिलंय. ती बघ, गुलाबी रंगाची कितीतरी फुलं आहेत, त्यापैकी तुझ्या पायाशी असलेल्या फुलाचं नाव आहे पिंकी. ती माझी मैत्रीण आहे, हो ना गं ?” “हो” पिंकी म्हणाली, “आमच्या जातीला माणसाने तेरडा हे नाव दिलंय. आणि या दगडाच्या बाजूला ही पांढरीशुभ्र, मोत्यासारखी गोलगोल फुलं आहेत ना, त्यांना गेंद म्हणतात.” “आणि सोनू, फांदीच्या एकाच बाजूला आलेली पांढरी फुलं कोणती गं ?” मी
वि
चारलं. सोनू म्हणाली, “ती कंगवा आमरी. बघ ना, कंगव्याच्या एकाच बाजूला दाते असतात अगदी तशी फांदीच्या एकाच बाजूला फुलं आली आहेत. त्यांच्याच बाजूला ब्रशसारखी दिसणारी टूथब्रश आमरी.” मी विचारलं, “मग ती सोनपिवळी फुलं ?” “त्याला म्हणतात ...” तिचं उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच ते पिवळं फूल म्हणालं, “ए सोनू, किती बोलतेस गं ! जरा मलासुद्धा थोडं बोलू दे की तुझ्या मैत्रिणीशी. बरं का गं, माझं नाव सोना. आमच्या जातीला सोनकी असं म्हणतात. आम्ही जगभरात फक्त कासपठारावरच आढळतो, माहित्ये ? आमची इतर काही जाती जगात इतर काही ठिकाणी सापडतात. त्याचा रंग आमच्यासारखा पिवळाजर्द नसतो काही, तर फिक्कट पिवळा असतो.” “स्वतःची एवढी स्तुती करू नका, सोनाबाई” पिंकी हसत म्हणाली. “हो, नाहीतर तुमचा जर्द पिवळा रंग उडून जाईल.” सोनू चिडवत म्हणाली. मी खुदकन हसले आणि म्हणाले, “तुम्हा फुलांमध्ये सुद्धा भांडणं होतात, चिडवाचिडवी होते की !” “आम्ही सगळ्या जणी मजा करतो, तुम्हीं मुलं करता ना, तश्शी.” सोना मात्र हिरव्यागार पानांमधे रुसून बसली. “ती तशीच आहे. रुसुबाई.” सोनू म्हणाली. मी म्हणाले, “पण कित्ती छान, आख्खं वर्षभर थंडगार वाऱ्यात मस्त मजा करत झुलत रहायचं...” सोनू थोडी उदास होऊन म्हणाली, “आख्खं वर्षभर नाही गं, आमचा फुलोरा फक्त ३ ते ४ आठवडे. या काळात आम्ही फुलायचं, नटायचं, प्रजनन करायचं, थोडी मज्जा करायची.” “पण इतका कमी वेळ का असतो तुम्हाला ?” “आम्हाला रुजायला, फुलायला आवश्यक असं हवामान श्रीगणेशोत्सवाच्या काळात असतं. तुम्हीं सगळे बाप्पाला म्हणता – पुढच्या वर्षी लवकर या... आम्हाला मात्र असं कुणीच न म्हणताही आम्ही दर वर्षी येतो आणि बघणाऱ्याला दर वर्षी इथे यायला भाग पाडतो.” “तूही येशील ना आम्हाला भेटायला पुढल्या वर्षी ?” सोनूने विचारलं. “हो, नक्कीच, पुढच्या वर्षी माझ्या मैत्रिणींनाही घेऊन येईन.”
तेवढ्यात आईने मला बोलावलं, मी जायला निघाले. जाण्यापूर्वी एकदा मागे वळून पाहिलं तर रुसकी सोना, बडबडी सोनू, गोड पिंकी वाऱ्याची झुळूक येताच झुलत होती, जणु ती मला म्हणत असावी “परत भेटू !”
मग काय मित्रमैत्रिणींनो, सोनू, पिंकी, सोना या माझ्या नव्या मैत्रिणींना भेटायला पुढच्या वर्षी कासला जायचं ना ?