स. न. वि. वि.
सध्या दिवाळी अंकांचे वाचन, फराळ चालू आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ च्या अंकात ही कविता वाचली.
‘मृत्युपत्र’
पूर्णपणे शुद्धीवर असताना
लिहितेय मी आज
माझे मृत्युपत्र
माझ्या मृत्यूनंतर
खंकाळा माझी खोली
चाचपून पाहा प्रत्येक वस्तू
बिनाकुलुपाच्या माझ्या घरात
पसरलय माझ सामान –
माझी स्वप्नं द्या
त्या तमाम स्त्रियांना
ज्या किचनपासून बेडरूम
पर्यंतच्या आपल्या सीमित दुनियेत
हरवल्या आहेत -
कितीतरी वर्षांपासून त्या विसरल्या आहेत
स्वप्नं पाहणं.
वाटून टाका माझ उन्मुक्त हास्य
वृद्धाश्रमातल्या त्या म्हाताऱयांमध्ये
ज्यांची मुलंबाळं
अमेरिकेतल्या झगमगत्या शहरांत
बेपत्ता झाली आहेत.
माझ्या टेबलवर बघा
काही रंग पडले असतील
त्या रंगांनी रंगवा त्या विधवेची साडी
जिच्या नवऱ्याच्या रक्ताने
रंगलीय सरहद्द
तिरंग्यात लपेटून
जो काल संध्याकाळी निजलाय.
माझी आसवे द्या तमाम कवींना
त्याच्या प्रत्येक थेंबातून
जन्मेल एक नवी गजल
वादा आहे माझा.
माझी गाढ निद्रा आणि भूक
देऊन टाका ‘अंबानी’ना, ‘मित्तलां’ना
ना आरामात झोपू शकतात बिचारे
ना मजेत खाऊ शकतात.
माझा मान, माझी अब्रू
त्या वेश्येच्या नावे करा
शरीर विकते जी
आपल्या मुलीला शिकविण्यासाठी.
ह्या देशाच्या प्रत्येक युवकाला
पकडून द्या इंजेक्शन
माझ्या आक्रोशाचे –
क्रांतीच्या दिवशी
त्यांना त्याची गरज पडेल.
माझं पागलपण
त्या सूफीच्या हिश्यात आहे
सारं काही सोडून जो निघालाय
ईश्वराच्या शोधात.
बस !!!
बाकी उरली
माझी ईर्ष्या
माझा लोभ
माझा क्रोध
माझे खोटेपण
माझा स्वार्थ -
तर
असं करा
त्यांना माझ्यासोबतच जाळून टाका.
कवीः बाबुशा कोहली, अनुवाद: रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
मला या वयात ही कविता म्हणजे माझंच मृत्युपूर्वीचं ‘इच्छापत्र’ आहेसं वाटलं.
तुम्ही माझ्या वयाचे व्हाल तेव्हा तुम्हाला कोणती इच्छा व्यक्त करावीशी वाटेल?
जग जवळ येतंय. आजची विशितिशितली जगभरची मुलांची पिढी, धर्मांधतेची बंधने झुगारून स्वत:ला ‘जागतिक नागरिक’ समजूनच जगत आहे. ‘माझा देश’ हा आता वृथा अभिमान आहे, हे त्यांना उमगलंय. हे चित्र पाहताना मनात येत की तुमच्यापुढे तरी उतारवयात असं व्यथित ‘इच्छापत्र’ लिहिण्याची गरज उरणार नाही.
नववर्षाच्या शुभेच्छा. पालकसभेत भेटूच.
‘A Bronx Tale’ विषयी गप्पा मारायला मजा येईल.
---लताआजी