This is a letter which appeared in Lokrang on 12th Feb.2012. Lata Aji thought we all should read it. So Iam posting the same.
.. आणि वास्तवातली मृगया!‘लोकरंग’ ८ जानेवारीच्या अंकात आलेली ‘आर्त प्रेमाची गोष्ट’ ही ‘बालमैफल’मधील आदिवासी लोककथा वाचनात आली आणि ४०-४५ वर्षांपूर्वी प्रत्यक्षात घडलेली एक घटना डोळ्यांपुढून सरकून गेली.फलटणच्या दक्षिणेला गिरवी हे माझे सासरगाव. सासरघरी पाहुणे आले की हमखास त्यांना शिकारीला न्यायचा बेत आखला जाई. असाच एकदा मी गिरवीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी रीतीप्रमाणे मला शिकार पाहायला नेण्यात आलं. एका पठारावर हरणाच्या नर-मादीची जोडी अगदी रंगात आली होती. शिकारी आल्याचे त्यांना भानच नव्हते. शिकाऱ्याने त्यांच्यावर बंदुकीचा नेम धरला असता माझे मेव्हणे म्हणाले, ‘अरे, मारू नकास त्यांना. हरणाची जोडी फोडून पाप करू नकोस.’ पण तेवढय़ात शिकाऱ्याकडून गोळी सुटली अन् नर खाली पडला. हात-पाय झाडू लागला. या अकस्मात आघातानं घाबरलेली त्याची मादी त्याला चाटून उठवायला बघत होती. पण तो गतप्राण झाला होता.थोडय़ा वेळानं रामोशांनी नराचे पुढचे दोन आणि मागचे दोन पाय बांधून आणि त्यात भाल्याची काठी घालून मृत नराला उचलून खांद्यावर घेतलं आणि ते गावाकडे निघाले तरी मादी त्याला चाटतच होती. ओढा ओलांडला तरी मादी माघारी जाईना. गावाजवळचा ओढा आला तसे रामोशाने मादीला कानाला धरून ओढत लांब नेऊन सोडलं. पण तरीही लगेचच झेपा घेत मादी पुन्हा नराजवळ आली आणि त्याला चाटू लागली. सगळेजण गावात शिरले, तेव्हा गावातली तीन-चार कुत्री भुंकत आली. मग मात्र हरणाची मादी पळून गेली. कुत्र्यांनी तिचा पाठलाग केला. पण हरणाचा वेग कुत्र्यांच्या चौपट! मादी जंगलाच्या दिशेनं गायब झाली.दुसऱ्या दिवशी मी म्हसवडला- माझ्या गावी निघालो. शाळेजवळ आलो. पाहतो तर तिथे तीच हरणाची मादी पळत आली अन् शाळकरी मुलांच्यात पाळलेल्या कुत्र्यासारखी बागडू लागली. मुलांनाही गंमत वाटली. ती तिला गोंजारू लागली. मादी मुलांच्या अंगाला डोके घासून गावाकडे बघे. घंटा झाली, मुले गेली, आणि मादी जानाई देवीच्या देवळामागे उंचवटय़ावर जाऊन बसली. माझे मेव्हणे सोबत होते. ते मला म्हणाले, ‘मादी काय म्हणतेय कळलं का? मी म्हणालो, ‘नाही.’ तेव्हा ते म्हणाले, ‘मादी मुलांच्यात बागडत नाहीए, तर त्यांच्या अंगाला डोके घासून गावाकडे बघतेय. ती सांगतेय की, माझा जोडीदार गावात आहे, त्याला सांगा- मी आले आहे. पण मुलांना हे कसं कळणार?’महिनाभराने मी पुन्हा गिरवीला आलो. मी आणि मेव्हणे गावाकडे निघालो. शाळेजवळ आलो तर हरणाची मादी मुलांमध्ये बागडत होती. घंटा झाली. मुले शाळेत गेली. मादी ठरावीक उंचवटय़ावर जाऊन बसली. आम्ही दोघं गावात आलो. नराचे कातडे हळद-मीठ लावून वाळवायला एका माणसाकडे दिले होते. त्याच्याकडे गेलो. त्याने कातडे वाळवून ठेवले होते. ते मेव्हण्यांनी आणायला सांगितले. वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून एका पोत्यात घालून ते आम्ही सोबत घेतले आणि पुन्हा शाळेकडे आलो. मादी देवळामागे उंचवटय़ावर बसली होती, तिथे गेलो. मेव्हण्यांनी कातडे बाहेर काढले. तर मादी लगेचच जवळ आली आणि कातडे हुंगून चाटू लागली. मेव्हण्यांनी ते कातडे जमिनीवर टाकले. तेव्हा केसांची बाजू वर करून मादी ते कातडे चाटू लागली. मग मागे वळून आपलं पोट चाटायची. आणि पुन्हा डावीकडे वळून कातडं चाटायची. असा अर्धा-पाऊण तास झाला. मेव्हणे मला म्हणाले, ‘कळलं का, ती काय सांगतेय? ती नराला सांगतेय- तू गेलास, पण तुझं बाळ माझ्या पोटात वाढतंय. मी तुला विसरले नाही आणि विसरणारही नाही.’दोन-तीन दिवस माझे मेव्हणे ते कातडं घेऊन शाळेजवळ जायचे. मादी अर्धा-पाऊण तास कातडं आणि स्वत:चं पोट आळीपाळीने चाटायची. मात्र, तीन-चार दिवसांनी ती मादी तिथं यायची बंद झाली. मेव्हणे म्हणाले, ‘तिला आता कळलंय, की आपला नर आता जिवंत नाही.’ त्यानंतर मादी पुन्हा म्हणून गावाकडे फिरकली नाही. या घटनेचा परिणाम असा झाला की, माझ्या मेव्हण्यांनी पुन्हा म्हणून बंदूक हातात घेतली नाही. आणि मीही मांस खाणे कायमचे सोडून दिले.- बाबुराव माने, म्हसवड.
No comments:
Post a Comment