Sunday, November 13, 2011

अनिल अवचट

|| श्री गुरवे नम: ||

अनिल अवचट

यांनी अनेक जणांना व्यसनमुक्त करण्यासाठी मदत केली. त्यांनी मुक्तांगण संस्था स्थापन केली आहे. असे गृहस्थ लताआजींनी शिबिरात बोलावले होते. त्यांच्याबद्दल लताआजींनी असं सांगितले की अनिल अवचट हे बासरी वाजवतात, ओरिगामी करतात¸ पुस्तके लिहितात, (लेखक आहेत)´. त्यांनी मुक्तांगण संस्था स्थापन केली आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी या संस्थेसाठी अनिल अवचटांना खूप सहकार्य केले. अशा व्यक्तीला मी पहिल्यांदाच पाहिले व त्यांच्याबरोबर संवाद साधायची संधी सर्वांना लाभली.

त्यांचा पहिला मुद्दा व्यसन हा होता. व्यसनात चांगले व्यसन व वाईट व्यसन असते. चांगले व्यसन म्हणजे एखादे चांगले काम करणे व ते सतत चालू राहणे होय. वाईट व्यसन म्हणजे एखादी वाईट गोष्ट सतत करणे. उदा., दारू पिणे, चोरी करणे, तंबाखू खाणे, इ. अशा व्यक्तींसाठी अनिल अवचटांनी मुक्तांगण ही संस्था स्थापन केली. सुनंदा अवचटांनी अनिल अवचटांना सहकार्य केले. सुनंदा अवचट यांनी व्यसनग्रस्त लोकांना आईसारखे सांभाळले. अनिल अवचट हे या लोकांशी प्रेमाने, आपुलकीने व माणुसकीने बोलायचे. ते त्यांना वाईट व्यसन सोडा असा उपदेश करायचे. त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते. हे व्यसन हळूहळू सोडले पाहिजे. व्यसनामुळे तोंडात शिव्या येतात. पण व्यसन सुटल्यावर जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांची भाषा चांगली होऊ शकते.

दुसरा मुद्दा होता, वेळ कसा घालवावा. आपण टीव्ही न पहाता वेळ कसा घालवायचा हे त्यांनी सांगितले. वेळेला खूप महत्व असते. वेळेचे महत्व लक्षात घेऊन काही माणसे जगतात. आपल्याला कंटाळा आला असेल तर टीव्ही न पहाता काहीतरी हाताने केले पाहिजे. उदा. ओरिगामी, आपले खण लावणे, घरातल्या छोट्याछोट्या वस्तूंची दुरुस्ती करणे इ. हाताने काम केल्यावर मेंदू तरतरीत राहतो. तसेच महत्वाचे म्हणजे, वाचन. वाचन करताना आपले संपूर्ण लक्ष वाचनाकडे असले पाहिजे. नाहीतर मन चंचल राहते. वाचनाकडे आपली एकाग्रता असली की टीव्हीचा मोह होत नाही. आपल्याला कंटाळा आला असेल तर अशा विविध गोष्टींचा उपयोग केला पाहिजे.

उन्मेष परांजपे.

1 comment: