Tuesday, April 23, 2013


This post is from Lata Aaji. Everybody is expected to read it & think about it before Vidyatai Bal's session

बाग
मोठ्या मुलांच्या शिबिरात मी एकदा मुलांना म्हटलं, चला आपण बाग बाग खेळूया आज.’’
प्रतिसाद शून्य! सर्वांच्याच चेहऱयावर भलं मोठं प्रश्नचिन्ह. मला तेच हवं होतं. चेहऱयावरचं प्रश्नचिन्ह स्पष्ट उमटून तिथं स्थिरावलेलं दिसल्यावर मी त्यांना म्हटलं, आपलं छोटं शिबिर म्हणजेच आपली आजची बाग. तिथली जमीन, झाडं, फुलं, पानं, फुलपाखरं हे सगळंच त्यात आलं.’’
आजी, आणि फुलपाखरं म्हटलं की कोश, अळ्या, अंडी, पानफुटीची पानं सगळंच दिसायला लागलं बघ.’’
त्यावर मी म्हटलं, आलं न लक्षात? झाड म्हटलं की एक बोट दाखवून म्हणता येतं हे पाहातसंच फुलपाखरं, पाखरं, सर्व काही बागेपासून वेगळं, सुटं, सुटं दाखवता येतं. पण त्याअर्थी बाग अशी या सर्वांपासून सुटी वेगळी दाखवता येते कां?’’
अग, कशी दाखवता येणार ती? त्या सर्वांपासून सुटी, वेगळी अशी ती नसतेच मुळात.’’
मी आनंदून म्हटलं, वा! खरं बोललीस अगदी. आता आपण असंच आपल्या शिबिराबाबत बोलून पाहूया.’’
मुलं खुशालली, तात्काळ विसावली, तोच एक मुलगा म्हणाला, बागेत मी आणि माझ्यात बाग.’’
आम्ही खेळाला हसत हसत सुरुवात केली.
मी मुलांना म्हटलं, एखादी बाग आपली अगदी खास असते. लहानपणी तुम्ही माझ्याबरोबर पारशी कॉलनीतल्या पाच बगिच्यांपैकी एका मोठ्या बागेत येत होता, कधी तिथं खेळत होता, कधी सुंदर फुलं घेऊन तिथल्या हिरवळीवर भलीमोठी रांगोळी घालत मनातली कृतज्ञता व्यक्त करीत होता; ती बाग आज तुम्हांला कशी वाटते? कधी तिथं जावंसं वाटतं का?’’
मनवा म्हणाली, मागे माझी एक जिवलग मैत्रीण पुण्याला शिफ्ट झाली तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी अस्वस्थ झालो. अगदी उदास, उदास वाटायला लागलं. मग मी त्यांना सुचवलं, ‘चला, बागेत जाऊन बसूया.’ माझ्या कॉलेजजवळच ही बाग आहे. तिथं जाताच किती बरं वाटलं म्हणून सांगू! ही बाग म्हणजे माझी कुणी आप्तच आहेसं वाटलं मला.’’
मी त्यावर म्हटलं, बाग म्हणजे तिथली झाडं, पानं, फुलं हे सारं आलंच. त्यात कधीतरी आपणही बागेत असतो आणि तेव्हा एक अप्रूप घडत असतं. आपण असतो बागेत आणि बाग असते आपल्या मनात. असंख्य आठवणींचा साज देऊन ती बाग आपल्याला कुशीत घेते आणि ध्यानात येतं की, मनातली ती बाग झाडं, पानं  दाखवल्यासारखी दुसऱया कुणाला स्वतंत्रपणे कधी दाखवता येणार नाही. आपलं आपल्यालाच बागेचं ते आगळंवेगळं अस्तित्व बारीकसारीक कंगोऱयांसकट जाणवत असतं.
आणि एक गोष्ट असते. बागेच्या बाबतीतलं हे वास्तव इतरही अनेक बाबतीत आपल्या प्रत्ययाला येऊ शकतं. तो प्रत्यय आनंददायी तर असतोच, शिवाय प्रत्येकवेळी वास्तवाचं ते दर्शन आपल्याला आपलीच एक वेगळी ओळख करून देत राहातं.
आता आपलं शिबिरच पाहा नं! शिबिरात आपण गातो, नाचतो, सहलीला जातो, छान छान वस्तू बनवतो, सुंदर चित्र काढतो ते सारं इतरांना अगदी रसभरीत वर्णन करून आपल्याला सांगता येतं, पण तेव्हा आपल्या ध्यानात येतं, की आपल्या वर्णनात शिबिराची हकिकत आहे पण त्यापलीकडचं जे काही सांगता येत नाही ते इतकं आहे आणि खरं तर तेच आपल्या दृष्टीनं खरंखुरं शिबिर आहे.’’ एक मुलगा म्हणाला, म्हणजे आपण शिबिरात आणि शिबिर आपल्यात असं जे असतं त्यातला आपण शिबिरातहा भाग आपल्याला इतरांना सांगता येतो आणि तो त्यांना बऱयापैकी समजतोही, पण शिबिर आपल्यात हा जो दुसरा भाग आहे नं तो ना धड सांगता येत दुसऱयाला, आणि नाही तो कधी फारसा भावतही कुणाला.’’
मी म्हटलं, हे अगदी खरं आहे. तुम्ही आज किशोरवयात आहात. अशा आपल्या ज्या खास गोष्टी किंवा एखादा खजिना असतो नं त्यांच्याकडे आपण एकट्यानं अगदी एकांतात किंवा आपल्या या शिबिरात आपण सारे मिळून कधीमधी अगदी शांतपणे पाहावं. असं पाहणं आपल्याला स्वतची एक ओळख नव्यानं घडवतं. आज आपण तसा प्रयोग करून पाहूया. तुम्ही पाच दहा मिनिटं स्वस्थ बसा, थोडा विचार करा आणि मनात जे जे उमटेल ते खुल्या मनानं सांगत चला. बघू या, आपल्याला काय कसं जमतंय ते.’’
दहा मिनिटं अगदी निशब्द शांतता होती. मुलं विचारात गढून गेली. सुरुवात ओम्नं केली. तो सांगू लागला, मला एखाद्या नव्याच गोष्टीत रस आहे याचा सुरुवातीला मला पत्ताच नसायचा. म्हणजे पहिल्यांदा सुधांशूकाकानं शिबिरात फुलपाखराचा कोष आणला आणि शिबिर सुरू असताना एक सुंदर फुलपाखरू त्यातून जन्मलं. ते सारं नवल मला खूपच भावलं. पण आज विचार करतो तेव्हा ध्यानात येतं, की त्या फुलपाखरामुळे काय काय घडलं! मला फुलपाखरांचा नाद लागला. त्यांच्याशी खूपच ओळख झाली आहे माझी. फुलपाखरं हवी म्हणून मी बाग बनवू गेलो, त्यातून झाडापानांनी मला लळा लावला. त्यांचं चित्रण करावं म्हणून बाबानं कॅमेरा आणून दिला. मी रीतसर फोटोग्राफी शिकलो. ओंकारलाही हे सारं आवडतं म्हणून आमची गट्टी जमली. मला निसर्गाची इतकी आवड आहे हे शिबिरामुळे माझ्या ध्यानात आलं.’’
हे ऐकल्यावर मोहित म्हणाला, मला कुठे चित्रं काढायला आवडायचं? पण इथं वारली चित्रकला शिकल्यावर अक्षरश एक चाळा म्हणून त्या शैलीत वेगवेगळ्या आकृती रेखाटत बसायचो. बघता बघता मी वारली चित्रशैली स्वतच आत्मसात केली. मलाही चित्रकलेत रस आहे आणि त्यात थोडीफार गतीही आहे हे माझ्या अचानक ध्यानात आलं.’’
मी म्हटलं, तीच तर गंमत आहे. दर रविवारी छोट्या शिबीरात एकेका उपक्रमातून मी नवी नवी दालनं तुमच्यासमोर उघडून ठेवते. कधी कुणी अधूनमधून त्यात नुसतं डोकावलं तरी मला ते पुरेसं वाटतं, कारण प्रत्येकजण स्वतचा उपजत कल समजून घेत राहतं. मग कुणी तुझ्यासारखं वारली चित्रकलेत रमतं तर कुणी इतर कशात. तुम्ही सगळे हळू, हळू रमतगमत आज असेच तर ओरिगामीमय झाला आहात.’’
यावर नील म्हणाला, मी तर आता शिक्षण संपवून नोकरीला लागलोय. तरीदेखील बहिणीला सोडायला म्हणून आता आलो आणि बसलोय इथंच.’’ मी त्याला म्हटलं, तू असा येतोस त्यातून एक महत्त्वाची गोष्ट घडत राहते. माझ्या सांगण्यापेक्षा तुझं सांगणं या मुलांना चटकन पटतं.’’ नील हसला तशी इतरही सारी खुदकन हसली. तो सांगू लागला, इथं कुणावरही कसलीही सक्ती केली जात नाही. त्यामुळे प्रत्येकाला इथं अगदी मोकळं मोकळं वाटतं. मी लहान शिबिरात असताना हॅरी पॉटर हौसेनं वाचायचो. त्यातलं एक वाक्य मला तेव्हा आवडलं. ते असं होतं की, माणूस स्वतच्या अंगच्या कौशल्यापेक्षाही तो प्रत्येक टप्प्यावर जी निवड (चॉइस) करतो त्या निवडीवर त्याचं यशापयश जास्त अवलंबून असतं. इथल्या स्वातंत्र्यात आम्ही नीट चॉइस करू लागलो.’’
सानिया म्हणाली, इथं आम्ही सगळेच खूप आपुलकीनं वावरत असतो. एकमेकांना समजून घेत, त्यांना मदत करायची जी सवय लागली त्याचा मला खूपच फायदा झाला. माझ्या मैत्रिणींत सर्वांना आज माझ्याबद्दल खात्री वाटते. कुणा दोघींचं भांडण झालं, की ते सोडवायला त्या हमखास माझ्याकडे येतात.’’
मनवा म्हणाली, मला तर त्या साऱया मध्यस्थच (Mediators) म्हणतात.’’ मग एकेक मूल सांगत गेलं तेव्हा माझ्या ध्यानात आलं की, या सर्वच मुलांनी समवयस्कांत खूपच विश्वास मिळवला आहे. हे अद्भुत आहे.
ओंकारनं आता एक वेगळाच पैलू मांडला. तो म्हणाला, इथं आम्हांला मौजमजा करायच्या एवढ्या गोष्टी समजल्या की मग मजा करणं म्हणजे परीक्षा झाल्यावर मॉलमध्ये भटकणं, बाहेर चटकमटक खाणं हे समीकरण इतर मुलांप्रमाणे आमच्या मनात कधी येतच नाही. हे ऐकून ऋतुजा म्हणाली, परवा परीक्षा संपल्यावर सर्वजणी म्हणाल्या आपण मॉलमध्ये जाऊ.’’ मी म्हटलं, त्यापेक्षा मला एक नवीनच कल्पना सुचली आहे. आपण एखादीच्या घरी पार्टी करूया. एखादं सूत्र (theme) घेऊया. यावेळी माझ्या घरी या. मी राजस्थानी सजावट करते. आपण तसेच कपडे घालूया. मी एखादा राजस्थानी पदार्थ बनवते.’’ माझ्या मैत्रिणींना ही कल्पना खूपच आवडली.
यावर ईशान म्हणाला, खरं तर या मोठ्या शिबिरात लहान शिबिरासारखी धमाल नसतेच. आम्ही एरवी मित्रांबरोबर जातो, भरपूर टाइमपास करतो. त्या तुलनेत शिबिरात आपण अनेक विषयांवर गंभीर चर्चा करतो. इथलं ब्रेन स्टॉर्मिंग सेशनखरोखर डोक्याचा भुगा करतं, पण घरी जातो तेव्हा आणि पुढे आठवडाभर अगदी ताजंतवानं वाटतं. इतर मित्रांबरोबर कितीही टाइमपास केला तरी असं ताजतवानं नाही होता येत.’’
सोहम् म्हणाला, इथं कितीतरी वैयक्तिक प्रश्न आम्ही मांडतो. त्यावर चर्चा करताना आजी आणि हे इतर सारेजण खूप आस्थेनं आमचे प्रश्न समजून घेतात. मार्ग सुचवतात. कधी कधी आजी तर त्या संदर्भात आमच्या व्यक्तिमत्त्वातल्या त्रुटींकडे, दोषांकडे आमचं लक्ष वेधतात. त्यावर मात कशी करायची ते सांगतात. कधी कधी ते स्वीकारताना आम्ही थोडे कचरतोदेखील पण आम्हांला कधीही दुखावल्यासारखं किंवा अपमानित झाल्यासारखं वाटत नाही.’’
मोहित म्हणाला, इथं सर्व पालक आणि आजी-आजोबा एवढं कौतुक आणि लाड करतात त्यामुळे आम्हांला हे जमत असणार.’’ मध्येच हर्षा म्हणाली, मी तर आता आतापर्यंत छोट्या शिबिरातच होते. तेव्हा मला अगदी छोटी मुलं बिलकूल आवडायची नाहीत. शिबिरातली छोटी मुलं बिलगायला आली तरी मला वैतागच यायचा. पण आता गेल्या वर्षभरात मोठ्या शिबिरात आल्यावर मला लहान मुलं खूपच आवडायला लागली आहेत.’’ आता गाडी वेगळ्याच वळणावर आली.
त्यावर ओम् म्हणाला, माझी मामेबहीण माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी लहान आहे. मला वाटायचं, मी एवढ्या छोट्या मुलीशी कसा काय खेळणार? पण प्रत्यक्षात आम्हा दोघांनाही एकत्र खेळायला खूपच मजा येते. कधी कधी तर माझे मित्र म्हणतात की, तुला बहुधा आमच्यापेक्षा तुझी बहीणच आवडते.’’
आता मितभाषी समृद्धीनं सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, शिबिरात येऊन आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे खूप वेगळ्या तऱहेनं पाहता येतं. माझा लहान भाऊ माझ्याहून खूपच लहान आहे. कधी तो हट्ट करतो, रुसतोदेखील. पण तो माझ्यावर खूप प्रेम करतो. आईबाबा जर कधी माझ्यावर रागावले तर तो माझी बाजू घेतो. मला रोज वाटतं की, मला भाऊ आहे ही किती मस्त गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणीलाही एवढाच लहान भाऊ आहे. पण तिला तो म्हणजे एक कटकट वाटते. तिला भाऊ बिलकूल आवडत नाही त्यामुळे तिची आणि भावाची गट्टी जमलीच नाही अजून.’’
अनिरुद्ध म्हणाला, पण कधी कधी आपण वैतागतो, वाईटही वागतो. मागे माझी आजी रस्त्यात पडली तेव्हा तिला विस्मरण झालं होतं. ती आम्हांला ओळखत नसे. शाळेतून दमून आलो तर कधी कधी आम्हांला न ओळखता आल्यामुळे ती तासन्तास दारच उघडत नसे. त्या वेळी मला खूप राग यायचा. वाटायचं आपल्याच वाट्याला कां म्हणून हा वैताग? असा आपल्याच आजीचा आपल्याला राग यायचा त्याचं वाईट वाटतं आजही.’’
मी त्याला म्हटलं, वाईट वाटतं आजही, हे खरंच. पण त्याबद्दल अपराधी भावना मात्र तू मनात जोपासू नकोस. जे झालं त्याला कारण ती परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीला आईच्या मदतीनं तुम्ही जसे सामोरे गेलात त्याला म्हणतात धैर्य. तुमच्यात धैर्य होतं म्हणून तुम्ही तुमच्याच कल्पना लढवत आजीमधली स्मृती जागवलीत. तुम्ही तिच्या मैत्रिणींना बोलावून ती जसा पत्त्यांचा डाव मांडायची तसा पत्त्यांचा खेळ त्यांना खेळायला लावलात. तिचे आवडते सिनेमे तिला पुन्हा पुन्हा दाखवलेत. आज आजी अगदी नॉर्मल आहे. त्यामागे तुमचं प्रेम आहे. प्रेमाला शिस्त लागत जाणं महत्त्वाचं. ते शिबिरात इतकं सहज घडतं की तुम्हांला ते जाणवतच नाही. फार कौशल्यानं आणि निगुतीनं मला ते करत राहावं लागतं. वेळी कधी कधी तुमचा, तुमच्या आईबाबांचा रोषही पत्करावा लागतो. पण जेव्हा असं काही उक्रांत माणुसकीचं दर्शन तुम्ही घडवता तेव्हा मला अगदी कृतकृत्य वाटतं.
परवा दिव्व्याची आजी हॉस्पिटलात वारली त्यावेळेस दिव्या आजोबांबरोबर घरी एकटीच होती. पण आईबाबा येईपर्यंत तिनं आजोबांना छान सांभाळलं. ती गडबडून गेली नाही.’’
स्वानंदी म्हणाली, ही बातमी कळल्यावर लगेचच मी तिला फोन केला पण ती स्थिरचित्त (stable) होती. ती म्हणाली, मी उद्या परीक्षेला जाणार. आता अभ्यास कसा करायचा तोच विचार मी करते आहे.’’
मी म्हटलं, हो. तिनं शेजाऱयांच्या घरी बसून अगदी शांतपणे अभ्यास केला. तुमच्या या शांतपणाचं मोल मला खूप वाटतं.’’
त्यावर संकेत म्हणाला, अशा वेळी आपली जवळची माणसंही अशी विचित्रपणे वागतात, की संताप येतो. दोन महिन्यांपूर्वी माझी आजी गावीच वारली. आम्ही सगळे लगेचच निघालो. वाटेत तिकडून एकसारखे फोन येतच होते. ‘लवकर याअसा आग्रह ते करत होते. बाबा पुन्हा पुन्हा आम्ही येईस्तोवर थांबा, वाटेतच आहोत.’’ हे सांगत होता. आम्ही पोहोचायला जेमतेम तासभर उरला असताना त्यांचा शेवटचा फोन आला, की ते थांबणार नाहीत. बाबांना खूप वाईट वाटतच होतं. पण आता त्यांना रागही आला. मी तर संतापलोच होतो. पण प्रत्यक्षात तिथं पोहोचताच बाबांनी जसा राग गिळला तसाच मीही माझा राग गिळू शकलो. मी त्या सर्वांशी जसं काही घडलंच नाही असा वागलो. याचं माझं मलाच नवल वाटत राहिलं.’’
नील म्हणाला, आम्हांला इथं अनेक कलांची गोडी लागली. त्यातून अनेक कलाकार निरपेक्षपणे इतरांना आनंद देतात हे कळलं. समाजसेवक किंवा अगदी आपल्यासारखी सामान्य माणसंही चांगली वागताना आम्हांला आवर्जून इथं दाखवली गेली. त्यामुळे चांगुलपणाचं मोल आतूनच कळत गेलं. याचा परिणाम दरवेळी चॉईसेस ठरवताना होत असावा. मी शिक्षणासाठी पुण्याला होतो. भरपूर स्वातंत्र्य होतं. आईबाबा भरपूर पैसे देत. पण कशाचाही दुरुपयोग करायचं कधी मनात आलं नाही. उलट त्या स्वातंत्र्यातून मी अनेक बाबतीत स्वावलंबी बनून गेलो.’’
मी मनात म्हटलं की, त्यामुळेच परतल्यावर नील त्यांच्या एकत्र कुटुंबात अगदी सहज सामावून गेला. हे जाणवल्यावर माझ्या आणि एक गोष्ट ध्यानात आली आणि मी त्यांना म्हणाले, तुम्ही मुलं घरात इतक्या प्रेमानं आणि जबाबदारीनं वागता की तुमचं नुसतं अवतीभवती असणं हेच आम्हा आजीआजोबांना टॉनिकसारखं वाटतं.’’
यावर स्वानंदी म्हणाली, याचं श्रेय आमच्या आईबाबांनाही आहे. माझ्या काही मैत्रिणी आहेत. त्यांची आई त्यांच्यावर इतकी दादागिरी करत राहते की, त्या कधी आईपाशी मन मोकळं करू शकतच नाहीत. काहीही बिनसलं की त्या माझ्या आईशीच बोलतात. आम्हांला घरात खूप मोकळं वागायला मिळतं.’’
त्यावर एक आई म्हणाली, हे आज खरं असलं तरी आम्हीसुद्धा सुरुवातीला खूप चुका करायचो. माझा मुलगा लहान होता तेव्हा शिबिरानंतर सगळे मिळून फ्लेमिंगो बघायला जाणार होतो पण सोमवारी परीक्षा आहे, घरी अभ्यास घ्यायला हवा म्हणून मी त्याच्यासोबत अभ्यास घेत घरी बसले. शेवटच्या क्षणी असा कितीसा फरक पडणार होता त्या युनिट टेस्टच्या मार्कात! आजही मला ते आठवलं की वाईट वाटतं. आज मात्र आम्ही सगळेच खूप बदलून गेलो आहोत. आता तो कॉलेजात जातो. त्याची सोमवारी परीक्षा असूनही सगळे मिळून प्रदर्शनाला निघालो तेव्हा त्यालाही जावंसं वाटलं आणि आम्ही त्या प्रदर्शनाला गेलो. आज माझ्या घरी त्याचे मित्र हक्कानं येतात. त्याच्या मित्राचे आईबाबा गावाला गेल्यावर तो मित्र एकटाच घरी राहणार होता. अशा वेळी मुलांना अशा मित्राच्या घरी राहावसं वाटतं. पण माझ्या मुलाला तसं वाटलं नाही. त्यानं मित्रालाच आमच्या घरी राहायला बोलावलं.’’
सरतेशेवटी एक बाबा म्हणाला, खरं सांगायचं तर आम्हांला सुरुवातीची काही वर्षं वाटायचं की, शिबिर मुलांसाठी आहे. पण मग ध्यानात आलं की शिबिर पालकांसाठी आहे. मुलांच्या निमित्तानं पालकांचंही संगोपन इथं घडत राहातं. ज्या पालकांनी ते प्रेम स्वीकारून ते स्वत बदलले ते इथं टिकून राहिले. त्यांची मुलं इथं अधिक चांगली घडत राहिली.’’
यावर त्याची पत्नी म्हणाली, इथं आत्मपरीक्षण वारंवार करणं भाग पडतं. सुरुवातीला आम्ही पळवाटा शोधायचो. ते अधिक सोपं असायचं. पण त्यात आपलं आणि मुलांचं असं दोघांचंही नुकसान आहे. हे उमगल्यावर आम्ही बदललो. आमच्या घरचं वातावरण मग हळूहळू बदलत गेलं.’’
आता पुन्हा मघाच्या बाबांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, इथं कधीही कुणाशीही तुलना केली जात नाही. कसलीही स्पर्धा इथं नसते. जेव्हा कुणी काही चांगलं काम करतं त्याचं इथं तोंडभरून कौतुक केलं जातं. एखाद्याला काही जमलं नाही, तर त्याला हिणवलं जात नाही. कोणतीही चूक केली तर त्याबद्दल क्षमा केली जाते. या सर्व गोष्टींमुळे आम्हांला स्वतला बदलणं सोप्पं गेलं.’’
सरतेशेवटी मला वाटलं शिबिरात आम्ही आणि आमच्यात शिबिर हे खरोखरच घडलंय म्हणायचं. इतक्यात एक आई म्हणाली, या शिबिरानं आम्हांला वैचारिक बैठक तर दिलीच, शिवाय नीतिमूल्यांचा भरीव पायाही आम्हा सर्वांना दिला. आज एका जबाबदारीच्या पदावर काम करताना माझ्या हातून कुणावरही अन्याय होत नाही याचं समाधान माझे सहकारी माझ्यापाशी वारंवार व्यक्त करतात. आज ही कुणीही मुलं न्यायानंच वागतील अशी खात्री आम्हा सर्व पालकांना वाटते. ही मुलं स्वार्थापोटी कुणाची संपत्ती किंवा स्वास्थ्य हिरावून घेणार नाहीत हा विचार आम्हांला खूप निवांत करतो.’’
यावर कृत्तिका म्हणाली, आम्हांला चांगलं वागावंसं वाटतं पण त्यापायी आमच्याकडून मित्रमैत्रिणींवर जबरदस्ती केली जाते, त्यांना आपण दुखवतो की काय असं आम्हांला वाटत राहातं. आता कालचीच गोष्ट सांगते. काल परीक्षा संपली म्हणून आम्ही काही मैत्रिणी मजा करायला म्हणून बाहेर पडलो. सिनेमा पाहिला. तोवर भूक लागली म्हणून खायला गेलो. खाऊन झाल्यावर आइक्रीम पार्लरकडे निघालो तेव्हा वाटेत एक सायकल उभी होती ती अनवधानाने आमचा धक्का लागून पडली.  ती होती एका दूधवाल्याची सायकल. दूध अगदीच थोडं होतं भांड्यात, पण ते गेलं सांडून. दूधवाला भरपाईपोटी शंभर रुपये मागू लागला. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, आपण याला पैसे कां द्यायचे? आपल्या आईवडिलांनी कष्टांनी कमवलेत ते!’’ मी म्हटलं, आपण आइक्रीम न खाता वाचलेले पैसे त्याला द्यायला हवेत. तसं केल्यानं आपण आईबाबांवरही अन्याय केल्यासारखं होणार नाही आणि दूधवाल्यावरही. बरीच वादावादी झाली आणि आम्ही त्याला शंभर रुपये दिले. मात्र माझ्या मैत्रिणींना माझा विचार पटला नव्हता हे त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यावर माझं मलाच कळेना, मी चूक वागले की बरोबर?’’
मी म्हटलं, मूल्यं जपत जगताना अशी सत्त्वपरीक्षा सतत होत राहाते. पण मूल्यांनी वागत गेलं, की हळूहळू आपल्याला इतरांच्या नाराजीचं किंवा कधीकधी तर वाट्याला आलेल्या स्वतच्या अपमानाचंही काहीच वाटेनासं होतं. मूल्याधिष्ठीत जीवन जगण्याची ती किंमत असते.’’
हे ऐकल्यावर आमोदने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, कॉलेजात एकदा काही कारणासाठी रांगेत उभं राहिला लागलं. उशिरा आलेले मित्र मला म्हणाले, तू पुढे आहेस तर आमचंही काम करून टाक. मी त्यांना नाही कसं म्हणणार? ते चालण्यासारखं नव्हतं. रांगेत माझ्यामागे तातकळत उभे असलेले सगळेच माझे वर्गमित्र होते. मला खूप अपराधी वाटलं पण पूढे जेव्हा अशी रांगेत उभं राहायची वेळ आली तेव्हा मी खूपच लवकर पोचलो. रांगेत पहिला मीच होतो. खिडकी उघडल्यावर माझे काम लगेच झाले. पुढचा व्याप वाचला.

No comments:

Post a Comment