Friday, January 15, 2016

Post from Lata Aji

१४/१/२०१५

तुम्ही सर्वांनी BLOG वर माझ्याशी केलेल्या गप्पा आवडल्या. आपलं जगणं अधिक

सकस करायचे कष्ट करताहात याचा खूप आनंद झाला. जगणं सकस करायचं तर

आधी आपण आला दिवस कसा घालवतो आहोत याकडे डोळ्याला डोळा भिडवून

पाहयला हवं. इथं भ्याडपणा चालत नाही. ते धैर्य तुमच्यात आहे.

जगण्यात आनंद भरलेलाच असतो. तो आपला आपणच हरवून टाकतो. बेजबाबदार,

स्वार्थी जीवनशैलीपायी तो हरवतो. आनंद हरवला, की जगणं म्हणजे निव्वळ चिखल

बनत. पाणी आणि माती ही दोन्ही पंचमहाभूतांपैकीच. नवनिर्माणाची अपार क्षमता

या दोघांपाशी आहे. पण त्याचा जर चिखल केला तर त्यात उत्तम बीजही कुजून 

जात.

उत्क्रांतीच्या वाटेवर  आपल्याला हा नवा विकसित मेंदू  लाभला. त्याच्या मदतीनंच  माणसानं 

जगणं सुखकर करण्यासाठी नाना शोध लावून तंत्रज्ञान विकसित केलंय. पण सुखकर जगणं हवं,

तर आधी ते आपणं सुसह्य केलं पाहिजे. स्वार्थ, निराशा, द्वेष हे सारे जिणं नकोसं करतात. या

नव्या मेंदूतून लाज, द्वेष अशांसारख्या नव्या भावना माणसात उपजल्या. लाज सोडली, की

आपण कोडगे होतो. संवेदनशीलताच मनोमन हरवून बसतो. द्वेषाची आग तर सारंच  जाळून

टाकते. आनंदाची छोटीशी झुळूकही आपल्याला निवांत करते. आपल्या वाटल्या अनेक माणसं

योगायोगाने येतात. आपणं त्या साऱ्यांना स्वीकारुया. त्यांच्याशी प्रेमानं वागलो, तरच ज्याचा

आपल्याला त्रास होतो असे त्यांच्यातील दोष दूर करायचा ते प्रयत्न करतील. दुसऱ्यांनी

आपल्याला सुखी करावं ही अपेक्षा करण्यापूर्वी  आपणं आधी ते जसे आहेत तसेच त्यांना

स्वीकारुया. त्यानं आपलीच ताकद वाढते. आपणं हळुहळू  सर्वांवर निरपेक्ष प्रेम करू लागतो. 

जगण्यातला सगळा आनंद या निरपेक्ष प्रेमात साठवलेला आहे.

आपलं जगणं आणि वागणं पारदर्शक  ठेवणं हे आपलं संसारातलं आद्य कर्तव्य आहे. जेव्हा

आपल्याला स्वत:च एखाद वर्तन चोरून करावंसं वाटत, तेव्हा ते बहुधा अनैतिक असत.

आपल्या  वाट्याला आलेल्या भल्याबुऱ्या माणसांचा आणि सुखदुःखाचा सहज स्वीकार करत

आपणं जगायला हवं. एकदा एका पालकानं  मला छान सांगितलं, ती म्हणाली, ‘ देव

आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटना एखाद्या स्लाईड शो सारख्या ठेवतो आणि

विचारतो , ‘याला क्षमा करशील  अशी  शीलता अंगी बाणवत ती मुलगी आज जगते आहे.’

‘व्यथा असो, आनंद असू दे

प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे

गात पुढे मज जाणे’

या श्री. मंगेश पाडगावकरांच्या ओळी त्यांनी स्वत:च्या  जगण्यातून आपल्याला दाखवल्या,

जीवनात सुखदु:ख  आहेच, पण ते सारे निसर्गाचे ‘बहाणे’ आहेत. हे ओळखल्यावरही 

‘डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले  गाणे’ अशी परिस्थिती त्यांच्यावरही वारंवार येतच

राहिली. पण त्यांनी स्वत:चे आतलं गाणे हरवू दिले नाही. पाडगावकर गेले पण स्वत:च्या

काव्याप्रमाणे स्वत:च्या जगण्यातूनही त्यांनी जगण्यावर प्रेम करून निकटवर्तीयांना दाखवलं.

त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणाली, जगण्याला लायक केलं बाबांनी मला.’

हे सारं जमवत जमवत जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं. आपणही जीवनातला आनंद हरवू न

देता जगूया आणि दुसऱ्याच्या आनंदाआड न येण्याबाबतही आपण दक्ष राहूया.

-Lata Aji

Tuesday, January 5, 2016

मी ज्ञानेश्वरी वाचत असते तेव्हा तेवढ्या काळापुरतं तरी मला जगनमाऊलीच्या कुशीत विसावल्यासारखं निवांत वाटतं. खूप शांत शांत वाटतं. माझ्या आणि ज्ञानेश्वरांच्या मनमुराद गप्पा होतात.
काल वाचता वाचता ज्ञानेश्वरांच्या एका दृष्टांतानं मी अगदी चकीत झाले. विषयवासनेनं खुळावलेल्या आणि त्यापायी अत्यंत हीन पातळीवरचं जिणे जगणाऱ्या माणसाचं त्यात वर्णन होतं. त्या माणसांना ज्ञानेश्वरांनी ‘पूयपंकीचे किडे’ असं म्हटलंय. पूयपंक म्हणजे जुनाट, चिघळलेल्या जखमेच्या पृष्ठभागावर जमलेला पुवाचा चिखल. ज्ञानेश्वरांची विज्ञानाची जाण पाहून मी अगदी नतमस्तक झाले.
पुयपंकीचे किडे म्हणजे वैज्ञानिक परिभाषेत Anaerobic bacteria’. हे जीवजंतू पुवाच्या चिखलातच वाढू शकतात. त्यातील गोम अशी की पुवाच्या चिखलात प्राणवायूचा अभाव असतो. म्हणूनच ते वाढू शकतात. प्राणवायूशिवाय ते मजेत जगतात आणि आपली प्रजा वाढवतात.
हे वाचताना माझ्यातलं शहाणपण म्हणालं, हे जिणे तुझ्या जिण्यासारखच की? अवतीभवती इतकं हवेच प्रदूषण आहे. अन्न, पाणी सारे दूषित आहे. भयावह वाटाव इतका भ्रष्टाचार, शोषण, सारं बोकाळलंय, तरी तुम्हाला कुठं त्यापायी गुदमर जाणवतेय? तुम्ही सारेच अगदी मजेत जगताय की.’
बापरे! म्हणजे ज्ञानेश्वर मला माझीच पातळी दाखवताहेत तर नाही. मी माझीच सफाई माझ्या शहाण्या मनासमोर मांडू लागले. त्याला म्ह्टलं, ‘काय वाईट आहे त्यात? एवढया पुयपंकात मजेत जगतो आहोत हे कसं काय वाईट? ते ‘anaerobic bacteria’ प्राणवायूच्या अभावातही टिकून राहाताहेत. माणसानं अक्कल हुशारी वापरुन शोधून काढलेल्या नवनवीन प्रभावी एण्टीबायोटीक्सना दाद न देता जगताहेत. आपली प्रजा ते अधिक कणखर, जगण्यालायक बनवताहेत.’

त्यावर माझं शहाण मन उत्तरलं, ‘अवतीभवतीच्या उपभोगांच्या झमेल्यात, बेगडी दुनियेत रमल्यानं एका मह्त्त्वाच्या गोष्टींचा विसर पडतोय तुला. ज्ञानेश्वरी वाचताना सगळ अवधान एकवटून वाचत चला, असं ज्ञानेश्वर वारंवार बजावताहेत नं? पण अहंकार थोडा बाजूला ठेवून विचार करणे जमतच नाही तुला अजून. हे पुयपंकीचे किडे जगतात. अगदी भराभरा प्रजा वाढवतात हे खरं. पण अवघा जन्म माणसांना रोगी बनवण्यातच जातोय त्यांचा. प्रजननासोबत आपल्याजातीची विषप्रवृत्तीच वाढवायचा खटाटोप चाललाय नं त्यांचा? सारी शक्ती या दोन गोष्टीतच घालवताहेत ते.
त्या किड्यासारखं जगायचं आणि वर त्या जीवनशैलीचाच अभिमान बाळगायचा तर इतका उत्क्रांत मानव जातीतला जन्म हवाच कशाला तुला?

----- लता काटदरे

Monday, January 4, 2016

वाटेवरचं हे सोनमोहोराचं झाड.
ऐन शिशिरात, असं एकाच फांदीवर
पिवळेजर्द गुच्छ मिरवत,
झुलवत रमलेल पाहिलं,
तेव्हा वाटलं....
हे झाड किती जुनं! अगदी माझ्यासारखंच
म्हातारं आहे हे.
किती ऋतूचक्र उपभोगली, सोसली असतील
आजवर त्यानं.
त्याचं नुसत्या वसंताच्या चाहुलीनं या वयात
असं लुटुपुटुच बहरणं किती छान ! किती सुंदर !
क्षणभर हेवा वाटला त्याचा.
आठवणींच्या खेळातच विसावा शोधायचं
खरं तर त्याचं वय.
या वयातही असं फुलता येत कोणाला ?
मी त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं,
तेव्हाही ते माझ्या जरठपणाला
हसत नव्हतं, हिणवत नव्हतं.
हेही किती कठीण नं !
एकदा  वाटलं, इतकं आत्ममग्न
जगत राहिल्यावर इतरांची
वर्दळ, लगबग जाणवणारच कशी याला ?
पण लगेच ध्यानात आलं की
हे आत्ममग्न पण नाही त्याचं.
हे आहे ‘स्वस्थपण’
या स्वस्थपणातच
हे असं बहरणं झुलणं जमू शकतं
अगदी आपोआप.

----- लता काटदरे