काही दिवसांपूर्वी मी आणि ओम काही गाणी शोधत होतो . शिबिरातीलही काही गाणी (जी
कॅसेटमध्ये नाहीत अशी) मिळाली. आम्ही ती एकत्र म्हंटली.खूप खूप मज्जा आली. पुन्हा एकदा
छान आठवणी जाग्या झाल्या.नंतर (आनंदवनाच्या दृष्टीहीन मुलांच्या शाळेच्या बाहेर जी ) कविता
लावली होती ती सापडली. ती वाचल्यावर आनंदवन व तिथली ती शाळा डोळ्यासमोर उभी राहिली.
आपल्या सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी अशी ही कविता; तुम्ही सर्वांनी सुद्धा अनुभवावी
म्हणून इथे लिहीत आहे. शब्द्लेखनात प्रयत्न करूनही काही चुका झाल्या आहेत. त्या बद्दल क्षमस्व !
दृष्टीहीन मी - सृष्टीहीन मी
-------------------------
कसा दिसतो पक्षी? कसे असते हिरवे झाड?
सांगा ना हो कसे दिसते निळे निळे आकाश??
सांगा कसा गरुड मारतो आकाशी भरारी?
तेवत असते नयनी माझ्या राज नेहमी अंधारी
डोळ्यापुधाती दिसती वलये काळी तर कधी चंदेरी...
कुठले फूल गुलाबाचे,कमळाचे नि निशिगंधाचे?
आम्हीच का फक्त वासावरून ते ओळखायचे?
दाखवा ना त्या 'दवाचा' मला एक थेंब तरी
तेवत असते नयनी माझ्या राज नेहमी अंधारी
डोळ्यापुधाती दिसती वलये काळी तर कधी चंदेरी...
कसे वडील माझे, कशी आहे माझी आई?
सगळे म्हणतात गोजिरवाणी..म्हणजे कशी दिसते ताई?
निदान मी दिसतो कसा सांगा मला एवढे तरी
तेवत असते नयनी माझ्या राज नेहमी अंधारी
डोळ्यापुधाती दिसती वलये काळी तर कधी चंदेरी...
खरच....जल्मास मी आलो कशाला?
सृष्टीतला फक्त काळोख पाहिला...
का चितारले देवाने नुसतेच माझे डोळे तरी??
तेवत असते नयनी माझ्या राज नेहमी अंधारी
डोळ्यापुधाती दिसती वलये काळी तर कधी चंदेरी...
डोळ्यापुधाती दिसती वलये काळी तर कधी चंदेरी..............
No comments:
Post a Comment