कोकणात आमच्या गावाला मी लहानपणी पुष्कळदा गेलो आहे. उन्मेषच्या वयाचा असताना तर मे महिन्याच्या सुटीत कोकणात जाऊन आंबे खाणे आणि सोंगट्या खेळणे हाच कार्यक्रम असे.
रात्री अंगणात सोंगट्या खेळून झाल्यावर रायवळ आंब्याची टोपली पुढ्यात घेऊन, ते चोखून खाण्याची मजा औरच होती. माझ्याबरोबर माझ्याच वयाचे दोनचार चुलत भाऊ असत. दुपारी रहाटाचे पाणी अंगावर घेत दोणीवर आमची सामुदायिक आंघोळ होई आणि नुसता धिंगाणा चाले. मुंबईहून आठ दहा दिवस राहायला आलेल्या मुलांचे लाड होत.
बरोबर कोणी नसले तरी कोकणात जाण्याचा माझा नेम चुकत नसे. मी एकटाच जाई. हातात काठी घेऊन तिथल्या सड्यावर, आन्गारात मळ्यात पुळणीत फ़िरे. रहाट, गुरे ह्याचे मला अप्रूप होते. जोडीला तेथील दुकानात काम करणे आणि रानोमाळ भटकणे, तिथे क्वचित आढळणाऱ्या सापाबद्द्दल कुतूहल आणि भीती वाटे.
आता उन्मेशबरोबर गेलो तेव्हा त्याला रहाट दाखवता आला नाही. सर्व विहिरीवर पंप बसले आहेत. आंबे टोपलीत घेऊन खातात हे त्याला कधी अनुभवता आले नव्हते. त्याची मात्र त्याला फारच मजा आली.
पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली, सभोवती इतके पक्षी असताना लहानपणी त्या कडे आम्ही ढुंकून बघितले नव्हते. या खेपेला उन्मेष पक्षीच काय फुलपाखरे कीटक सारे काही बघत होता आणि मीही !!!
वीसेक वर्षांपूर्वी कदाचित तिथे आजच्या पेक्षा जास्त वन्यजीवन असणाऱ, नव्हे होतेच. पण एक लक्षवेधी असा, खास कोकणात दिसणारा 'धनेश' पक्षी सोडला, (ज्याला तिथे गरुड म्हणत, आजही म्हणतात) तर बाकी पक्ष्याचे निरीक्षण केलेलं आठवत नाही.
या वेळी मात्र पक्ष्यांच्या किमान चाळीस जाती दिसल्या त्या पूर्वी कधी असूनही दिसल्या नव्हत्या.
हे कशामुळे झाले असावे?
'Growing together'--- दुसरे काय. Thanks to Unmesh.