Thursday, August 9, 2012

I did some workshops on Gender Equality for State Govt Education Officers. It was a great experience. 
lekh on Samabhav




शुभदा चौकर 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) त्यांच्या पुण्यातील इमारतीत नुकतीच लिंगसमभावविषयक कार्यशाळा घेतली. चार दिवस चाललेल्या या कार्यशाळेत दोन गटांत मिळून राज्यातील सुमारे ४०० गटशिक्षण अधिकारी सहभागी झाले होते. अधिकारी पातळीवरील व्यक्तींच्या मनात लिंगसमानतेची बैठक पक्की रुजवायची या हेतूने हा उपक्रम विद्या परिषदेने हाती घेतला होता. 
..................... 

तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा... बालभारतीच्या तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील भा. रा. तांबे यांची ही कविता आणि सर्वांना गुणगुणावेसे वाटावे असे मधुर गाणे! पण परवा शिक्षण अधिकाऱ्यांच्या गटचर्चेत सारेजण मिळून या गाण्याची अर्थच्छटा उलगडून बघत होते आणि एका ओळीशी थबकत होते- ` ` चल निघ येथे नको बसू घर तर माझे तसू तसू... भावाने बहिणीला उद्देशून म्हटलेली ही ओळ लिंगविषमता ध्वनित करते ,यावर सर्वांचे एकमत झाले आणि मग अशी कविता मुलांना शिकवताना काय काय बोलावे लागेल त्यांच्या मनात काय काय पेरावे लागेल यावर प्रोत्साहक चर्चा झाली. निमित्त होते लिंगसमभावविषयक कार्यशाळेचे. 

या उपक्रमाचा आरंभ झाला सुमारे तीन महिन्यांपूर्वी. लिंगसमभाव या विषयाचा अभ्यास असलेल्या काहींना विद्या परिषदेने या उपक्रमात योगदान देण्याचे आवाहन केले. काही जण शिक्षण खात्यातील तर काही जण या खात्याचे नसलेले पण या कामाबद्दल जिव्हाळा असलेले अशा १८ जणांच्या टीमने या उपक्रमात भाग घेतला. या टीमच्या ५-६ लेखन-कार्यशाळा झाल्या. एका वेळी तीन-तीन दिवसांच्या अशा या ५-६ भेटींत मिळून एक मार्गदर्शक पुस्तक तयार झाले आणि त्याच बरोबरीने प्रशिक्षण साहित्यही. समाजात लिंग समभाव रुजवण्यासाठी कोणकोणत्या पातळ्यांवर विचार करावा लागतो कोणकोणत्या विषयांवर चर्चा व्हायला हवी शिक्षण खात्याला कोणकोणत्या बाबतीत विचारशील व कृतीशील करावे लागेल यावर बराच खल झाला. आणि मग साकारले- `` समानतेच्या दिशेने हे मार्गदर्शक पुस्तक आणि दोन दिवसभर चर्चेला पुरेल इतके प्रशिक्षण साहित्य! या पुस्तकात सुरुवातीलाच लिंगसमानतेची प्रतिज्ञा आहे. स्वभान आणि आत्मजागृती स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित नातेसंबंध सुजाण पालकत्व शासकीय ध्येय-धोरणे जेंडर बजेट आणि ऑडिट पाठ्यपुस्तकातील लिंगसमभाव असे काही विषय या पुस्तकात आहेत. हे पुस्तक-लिखाण आणि प्रशिक्षणाची आखणी करताना प्रत्येकाच्या मनात एक निश्चित होते की हा उपक्रम पुरुषांवर दोषारोप करणारा आणि महिलांना झुकते माप देणारा नसेल. लिंग समानता प्रत्यक्षात येण्यासाठी समाजातील प्रत्येकाला आपला दृष्टीकोन तपासून बघावा लागेल- महिला-पुरुष दोघांनाही. 

आता स्त्रीलिंगी गर्भापाताने खुडल्या जाणाऱ्या कळ्यांनी संवेदनशील समाजाला हलवून जागे केले आहे. मुलगी नकोशी ही भावना जोपर्यंत हद्दपार होत नाही तोपर्यंत असे अमानूष प्रकार थांबणार नाहीत आणि मुलींचे हे नकोशीपण संपवायचे तर लिंगसमभाव प्रत्यक्षात येण्याला पर्याय नाही. वरवर पाहता जिथे समानता नांदतेय ,तिथेही असमानतामूलक गोष्टी कळत-नकळत घडत असतात. म्हणजे शाळेच्या परिघापुरते बघायचे झाले तरी काही गोष्टी सहज जाणवतात. आजही काही शाळांमध्ये कार्यानुभवाच्या तासाला मुलींना बागकाम शिवणकाम असे पर्याय दिले जातात आणि मुलांना सुतारकाम इलेक्ट्रिकल ! (किंवा सर्वांनाच कम्प्युटर-शिक्षण - त्याची आवडगरज आणि सोय असो वा नसो!) खरे तर या विषयांतर्गत सर्व मुलांना जगण्यासाठी आवश्यक असलेली काही कौशल्ये प्राथमिक स्वरुपात तरी उदाहरणार्थ स्वयंपाक शिवण फ्यूज बदलणे विद्युत वायर जोडणी इ. शिकवता येणार नाही का काही शाळांमध्ये मुलगे मुली यांच्यासाठी वेगवेगळे सांघिक खेळ असतात- मुलींसाठी खोखो तर मुलग्यांसाठी कबड्डी! शाळेत काही कार्यक्रम असला की नटूनथटून पाहुण्यांचे स्वागत करायला मुली ,आणि बाकडी हलवायला मुलगे!! अशावेळी मुलग्यांच्या मनात स्वाभाविकपणे येते की या मुली चांगले कपडे ,दागिने घालून उगाच पुढे पुढे करतात आणि भाव खातात!!! 

शिक्षकांच्या खोलीतही काही वेळा अशीच भेदभावमूलक श्रमविभागणी होते. मुले वर्गात फार गोंधळ घालू लागली की त्यांना धाक दाखवायला किंवा धोपटायला एखाद्या कडक पुरुष शिक्षकाला पाचारण करायची क्लुप्ती काही शिक्षिका अनुसरतात. `` सांग मला गं सांग मला आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला या गाण्यात जशी एक ओळ आहे- ` ` गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई शक्तिवान किती बाबा असती ,थप्पड देती गुराख्याला... यातील साचेबंद प्रतिमा या शिक्षिका प्रत्यक्षात जगतात! वर्गावर शिक्षिकेचेही नियंत्रण असलेच पाहिजे. ती कला शिक्षिकांनीही अवगत करून घेतली पाहिजे. बहुतांश शाळांत मुला-मुलींसाठी स्वतंत्र ,स्वच्छ पुरेशी स्वच्छतागृहे नसतात. शाळेतील सोयीसुविधा दोहोंसाठी विशेषतः पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी पुरेशा आहेत ना याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे याबद्दलही या कार्यशाळेत गप्पा झाल्या. 

अनेकदा महिला अधिकारी पदावर असली की काही पुरुष तिला पूर्णपणे स्वीकारत नाहीत तिला जुमानत नाहीत. पुरुषांनी असा दृष्टिकोन ठेवणे चुकीचे आहे. महिलांनीही त्यांच्या वर्तनातून स्वतःचे स्थान बळकट केले पाहिजे. त्यासाठी स्वतःची निर्णयक्षमता वाढवली पाहिजे. स्त्रीत्वाचा गैरफायदा न घेता पूर्ण कार्यक्षमता दाखवली पाहिजे. तिचा सन्मान तिने मिळवला पाहिजे आणि इतरांना तो राखण्यास भाग पडले पाहिजे. अशा दैनंदिन वर्तनातून आपण लिंग-समभाव जगतोय ना याकडे प्रत्येकाने सजगपणे पाहावे- घरात कामाच्या ठिकाणी आणि समाजात वावरतानाही! 

या कार्यशाळांतून काही चालीरीती घटना प्रसंग यांचे दाखले देऊन खुल्या चर्चा झाल्या. त्या चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात कुणालाही न टोचता समजूतदारपणे घेण्याचा कटाक्ष सर्व प्रशिक्षकांनी पाळला. सर्व प्रशिक्षणार्थींची उत्साही उपस्थिती आशादायक होती. शिक्षणाधिकाऱ्यांचा संवेदनशील सहभाग वाखाणण्यासारखा होता. 

राज्यभरातील सुमारे ४०० शिक्षण अधिकाऱ्यांपैकी काहींनी समानतेचे रस्ते जाणीवपूर्वक पक्के करण्याची सुरुवात केली आहे. काहींनी आपापल्या घरातील शाळेतील अशी उदाहरणे दिली. त्यातून इतरांना स्फूर्ती मिळाली. काहींच्या प्रतिसादातून साचेबंदपणा किंवा गृहीतकांचा पगडा जाणवला. पण एकंदरीत सर्व जण स्वतःला तपासायला तयार होते. यापुढे अधिक जागरूकपणे वागू लिंगसमभावाचे दूत होऊ असे आश्वासन सर्वानीच दिले. विद्या परिषदेच्या सहसंचालक डॉ. शकुंतला काळे व अधिव्याख्याता अलका मुळीक यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला होता. संचालक नामदेव जरग तसेच इतर सर्व सह-अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिले. 

शिक्षणातून माणूस घडणे अपेक्षित असते. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून लिंगसमभाव रुजवला गेला तर संस्कारक्षम वयातील मुले त्यांच्यावर प्रभाव टाकणारे पालक आणि शिक्षक अशा विस्तृत समाजापर्यंत ही सम-भावना झिरपू शकते. लिंगसमभावाचा सखोल विचार हे अधिकारी आता अधिक बारकाईने करतील आणि कृतिशील होतील अशी डॉ. काळे यांची अपेक्षा आहे. या उपक्रमाचा पाठपुरावा म्हणून या अधिका-यांसाठी त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्याव्यात आणि ते जे या कार्यशाळेत शिकले ते त्यांच्यामार्फत शालेय शिक्षकांपर्यंत पालकांपर्यंत झिरपावे असा मानस डॉ. काळे यांनी व्यक्त केला. 

शालेय शिक्षणात मुलींना संधी देऊन लिंगसमभावाची रुजवात करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. आता पुन्हा मुलींच्या जन्माच्या स्वागताचे आव्हान पेलण्यासाठी शालेय शिक्षणाचे माध्यम शासनाने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षणाचे नेटवर्क मोठे आहे. त्यांनी ठरवले तर हे माध्यम लिंगसमभाव पसरवण्यासाठी परिणामकारक ठरू शकते.

1 comment: