Saturday, July 14, 2012

आमच्या घराजवळील एका विशिष्ट दुकानातून आम्ही रोजच्या वस्तू खरेदी करत असतो. माझ्याबरोबर काहीवेळा उन्मेष असतो. दुकानदार न मागताच प्लास्टिकची पिशवी देतो. मी हटकून ती नाकारतो. 'मागितली नसताना कशाला तू प्लास्टिकची पिशवी देतोस असेही एकदोनदा त्याला विचारले. त्यावर लोक  प्लास्टिकची पिशवी दिली नाही तर उलटे नाराज होतात असेच तो म्हणाला. एकदा उन्मेष एकटाच त्या दुकानात गेला. वस्तू घेतल्यावर नोकराने उन्मेषला प्लास्टिकची पिशवी दिली. उन्मेषने अर्थात ती नाकारली.
मालकाने हे बघितले. तो नोकराला म्हणाला, "अरे तो  प्लास्टिकची पिशवी न वापरणाऱ्या बाबाचा मुलगा आहे. तो ते गार आईस्क्रीम हातातून नेईल, पण  प्लास्टिकची पिशवी घेणार नाही." 
घरी आल्यावर उन्मेषने हे सर्व कथन केले, तेव्हा आपण योग्य तेच केल्याचे समाधान तर त्याच्या चेहऱ्यावर होतेच आणि बाबांबद्दलचा  अभिमानही!!

माझ्या आईचे पुण्याला माझ्या भावाकडे  अगदी अचानक निधन झाले तेव्हा उन्मेष शिबिरातील ख्रिसमस पार्टीला गेला होता. महेश स्वरुपा त्याला गाडीने घेऊन येत असतानाच ती बातमी मला कळली.  विशाखा पुण्यातच होती.  महेश स्वरुपा उन्मेषला बाहेर सोडून जाणार होते, मी त्यांना घरात यायला सांगितले. त्यांना बातमी सांगताच त्यांनी माझी पुढील सर्व व्यवस्था बघितली. स्वरूपाने विशाखाचे पुण्याला न्यायचे कपडे तर ब्यागेत भरलेच वर माझ्या हातात कालवून वरण भात ठेवला. उन्मेषला दुध विचारले. उन्मेषने गडबडून न जाता स्वताची व माझी ब्याग भरली. अगदी मोबाइल चार्जर घ्यायलाही तो विसरला नाही.  महेश स्वरूपाने आणि उन्मेषने तेव्हा मला जी मदत केली ती आधार देणारी होती.
पुढे उन्मेष शाळेत जायला लागल्यावरही काही दिवस साहजिकच अस्वस्थ होता. ते पाहून त्याच्या शाळेतील मराठीच्या रावते बाईनी एकदा वर्गातील सर्व मुलांना 'माझी आजी' या विषयावर निबंध लिहायला सांगितला. उन्मेषला आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी ही संधी मिळाली. तो त्या दिवशी घरी आला तेव्हा थोडा स्वस्थ व निवांत दिसला. शाळेने या छोट्याशा कृतीतून जी जाणीव दाखवली ती आम्हाला तिघानाही भावली. 
डॉ रवी बापट यांनी माझे इतरांपेक्षा वेगळ्या शब्दात सांत्वन केले. " आम्ही सर्व डॉ मंडळी तुझ्या आईला यातनामय जगणे देऊ शकलो असतो पण शांत मरण फक्त ईश्वराच्या हातात असते. ते तिला मिळाले. तुझी आई फार पुण्यवान असणार." या शब्दांनी या प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने मला पाहायला शिकवले. या सर्व घटना माझे मन शांत होण्यास सहाय्यभूत ठरल्या. 
 विकास

2 comments:

  1. तीनही घटना खूप छान लिहिल्या आहेत. very touchy. congrats Unmesh for being so matured- in managing things well and also avoiding plastic very strictly. keep it up.
    shubhada

    ReplyDelete
  2. Dear Unmesh, proud of you!!! children like you all will save the nature in future. Thank you. One more thing about Vikas...he always gives quality time to Unmesh and that to.. as per his requirement which is equally appreciable. So obviously, Unmesh has a right love & ABHIMAAN for his Baba.

    ReplyDelete