Wednesday, July 11, 2012


            

            मी गावाला जाताना आई भाऊ तसेच इतर नातेवाईकांना भेटावयास मिळेल या विचाराने आनंदित होते तसेच आमच्या कडे येणारे नोकर मंडळीनाही भेटावयास मिळेल याचे समाधान मिळते. यातील काहीजणी आमच्या कडे अजूनही येत आहेत. बऱ्याचजणी वयस्कर झाल्यामुळे गावात येणे बंद झालेले आहे.
       अशीच आमची एक मोलकरीण गावापासून दूर राहते. वयानुसार तिचे गावात येणेही होत नव्हते. परंतु मी ज्या दिवशी गावाला पोहचत असे त्याच्या दुसऱ्या दिवशी घरासोमर हजर होत असे. माझ्या आईलाही याचे आशर्य वाटते. तिला मी आलेला निरोप कोण देते हे एक गूढ आहे. मी जितके दिवस गावाला राहते तितके दिवस ती दररोज येते. मी कितीही नको सांगितले तरीही काहीना काही काम करत बसेल. तिला पैसे दिले तर शुभम, कृतिका करता बाजारात जाऊन काहीतरी खाऊ घेऊन येते. दररोज येताना काहीना काही रानमेवा घेऊन येते. फुले घेऊन येते. तिला काहीही नवीन घेऊन दिले तर ती घेत नाही कारण तिच्या घरातील इतर ते हिसकावून घेतात. ती फक्त जुने कपडे घेते कारण ते तीच वापरू शकते. प्लास्टीकच्या साध्या चपला मात्र तिला चालतात.
       यावर्षी एप्रिल मध्ये गावाला गेलो असताना तिच्याकरता द्राक्षे घेऊन गेलो होतो. तिला फारच आनंद झाला कारण इतकी गोड द्राक्षे तिने खाल्लेली नव्हती.  निव्वळ औषध उपचारा करीतच म्हणून काही पैसे दिले. तिला पावसाळ्यात आईकडे येवून राहायला सांगितले. तिला ते पटलेच नाही कारण ती तिथे आल्यावर माझ्या आईला तिचे सगळे करावे लागेल, तसेच कामाचा मोबदला मोजावा लागेल. पुढे ती म्हणालीकि मी स्वतः इतरांकडे काहीतरी छोटे-मोठे काम करून माझं उदरनिर्वाह नक्कीच करू शकेल. त्याचे मला पैसेही मिळतात.  तुझ्या  आईला माझ्या सारखे इतरांच्या घरी जाऊन असे काम करणे शक्य नाही. मग त्यांना पैसे कुठून मिळणार. माझ्या आईवरती तिला अतिरिक्त भार टाकावयाचा नाही आहे.
       तिच्या या विचार सरणीचा मला फार अभिमान वाटला. तिने माझ्या आईबद्दल दाखवलेली काळजी, आत्मीयता याचे मला फार कौतुक वाटले. आम्ही मुंबईला निघताना तिने आम्हाला २ किलो रेशनचे तांदूळ आणून दिले. जरी ते तांदूळ चांगल्या प्रतीचे नसले तरी तिच्या प्रेमापोटी आम्ही ते घेऊन आलो आणि ते खाल्ले सुद्धा.



शांतला स्वादी     

No comments:

Post a Comment