लेटी...एक चिमुकली मुलगी. ह्या सृष्टीलाच प्रेमाने कवटाळणारी. 'हे विश्वाची अपुले घर' कदाचित असा भाव माझ्या मनातल्या निरागस लेटीच्या बोलक्या चेहऱ्यावर आहे. प्रेम,सुरक्षितता व निवांतपणा असलेलं तिचं सुंदर घर त्या गोलावर तिला दाखवताच ती परमानंदाने तिथे ओठ टेकवते. सूर्याच्या कोवळ्या किरणांप्रमाणे असलेल्या तिच्या सोनेरी केसांनी ती आजूबाजूचा परिसरही जवळ घेऊन उजळवून टाकते.
लता आजींनी मागे सांगितलेल्या एका गोष्टीचा याच्याशी कुठेतरी संबंध आहे असा वाटला. 'नाती जोपासताना निरपेक्ष भावनेने सर्वांवर प्रेम करा . पण सर्वात आतल्या परीघावर (लेटीच्या घराप्रमाणे) आपल्या अतिशय जवळच्या प्रेमाच्या माणसांना ठेवत पुढच्या प्रत्येक परीघावर(तिच्या सोनेरी केसांप्रमाणे) वेगवेगळ्या स्तरांवर नाती सांभाळता येतात.'
दुसरा अर्थ असा जाणवला की मनापासून मायभूमीच प्रेम (लेटीचे ओठ टेकवलेले -इंग्लंड )जागृत ठेवून हळूहळू संपूर्ण(तिच्या केसांनी जवळ केलेला युरोप व तिने कवेत घेतलेला संपूर्ण गोल ) सृष्टीवर प्रेम करून कल्याणाचा मार्ग सापडू शकतो.
हल्ली आषाढी वारीबद्दल बरेच लेख पेपरमध्ये येत आहेत. त्यातीलच दोन ओळी याच्याशी समर्पक वाटल्या. 'अखिल विश्वावर मंगळाचा वर्षाव व्हावा यासाठी अविरत भ्रमण करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या पृथ्वीतलावर सतत सक्रिय राहो,असे मागणे ज्ञानेश्वर पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात.'
लेटीच्या रुपात आपण स्वतःला ठेवून विश्वशांती व प्रेमासाठी देवाकडे प्रार्थना करूया.
गेल्या शनिवारी(9 जून) लोकसत्तामधील 'विज्ञानवारी' (संपादकीय - पान 9) हे शीर्षक असलेला लेख जरूर वाचण्यासारखा आहे. आपल्या शिबिराशी निगडीत वाटला. त्याची लिंक खालील प्रमाणे आहे.
epaper.loksatta.com/41605/indian-express/09-06-2012#page/9/1
No comments:
Post a Comment